काजळमाया (Kajalmaya)




पुस्तक : काजळमाया (Kajalmaya)
लेखक : जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)
किंमत : २७७
ISBN : 81-7185-446-0

जी ए कुककर्णींच्या दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. एक दोन पौराणिक प्रकारच्या, एक दोन फँटसी आणि बाकी सध्याच्या काळातल्या कथा आहेत. 



हा कथासंग्रह मला विशेष आवडला नाही. "विदूषक","रत्न" इ. पौराणिक व फँटसी कथा या जीवनविषयक सूत्र सांगण्यासाठी किंवा काहितरी मौलिक उपदेश देण्यासाठीच बेतलेल्या आहेत असं वाटतं. त्यामुळे पात्रांच्या तोंडी लांबलचक संवाद आणि तत्वज्ञानाची काथ्याकूट असा प्रकार मला खूप कंटाळवाणा वाटला. हीच तत्वज्ञानाची चर्चा थेट वैचारिक निबंध म्हणून समोर आली असती तर आवडीने वाचली असती. पण कथेमध्ये त्यांचा अतिरेक होतो. 

सद्यकालीन कथा, कथा म्हणून चांगल्या आहेत. पण एकजात सर्व कथांमधलं वातावरण फारच निराशाजनक आहे.  जगण्यातल्या ज्या ज्या नकारात्मक बाजू असतील त्या आठवणीने गोळा करून कथा लिहिल्या आहेत. दुःख, दैन्य, दारिद्र्य, अपमान, विश्वासघात, अत्याचार, मृत्यू, अपेक्षाभंग अशा सगळ्या गोष्टी प्रत्येक कथेत भरपूर !! बहुतेक वेळा नायिका वृद्ध, जीवनाला विटलेल्या आहेत. तरूण वयाच्या असतील तर दारिद्र्याने गांजलेल्या, निपुत्रिक आहेत. नायक हे दरिद्री, व्यसनी, घरच्यांकडून अपमानित झालेले. त्यांच्या बायका-मुली बाहेरख्यालीपणा करतात, मुलं वाया जातात. गावातली आजूबाजूची मंडळी पण एकमेकांचे खून करणारी, लुबाडणारी. निर्सर्गाचं वर्णन पण सतत अंधारून आलंय, मळकट संधीप्रकाश, कुबट वातावरण असं. 
जरा हीच सुरुवात बघा (मोठं करण्यासाठी क्लिक करा) :

मृत जनावर, कुंद-अरुंद गल्ल्या, खुरटी काटेरी झुडपे, तापलेला अंधार, प्रेताची ताठर बोटे, उद्धट सूर्यप्रकाश, स्फोट, तपलेले कण... अरे अरे अरे काय हे ! सुरुवातीच्या एकाच परिच्छेदात हे असं तर पानंच्या पानं पुस्तक कसं असेल विचार करा.

त्यामुळे एक दीर्घकथा वाचल्यावर आपण एखाद्या बरेच दिवस बंद राहिलेल्या धूळ आणि बुरशी साचलेल्या हवेलीत, पावसाळी संध्याकाळी वावरतोय असं होतं. एकदोन कथा वाचल्यावर ही नेपथ्यरचना एकसुरी वाटू लागते. विनाकारण शब्दाला शब्द आणी प्रसंगाला प्रसंग जोडत आठवून आठवून दुःखी वातावरण निर्मिती कृत्रिम आणि कंटाळावाणी वाटते. मी तर पानं भराभर उलटली आणि "हं, ते दुःख कळलं , मुद्द्याचं बोला" असं म्हणत पुस्तक संपवलं; तेही एकावेळी अर्धी किंवा एक कथाच वाचून. एखाद्या नैराश्यग्रस्त किंवा कंटाळलेल्या माणसाने हे पुस्तक वाचलं तर त्याची उरलीसुरली उमेद आणि जगण्यावरचा विश्वास, माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वासच उडून जायचा. 

पण जगण्याचा या काळ्या भागाचं इतकं प्रभावशाली वर्णन आणि वातावरण निर्मिती अभ्यासण्यासाठी साहित्याच्या विद्यार्थ्यांनी, होतकरू लेखकांनी पुस्तक वाचायला पाहिजे. एकदा हे काळं औषध कसं बनवायचं कळलं की आपल्या कथेत त्याचा योग्य मात्रेत उपयोग करता येईल.




----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

लॉरी बेकर (Laurie Baker)





पुस्तक : लॉरी बेकर (Laurie Baker) 
लेखक : अतुल देऊळगावकर (Atul Deulagonkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १५४
ISBN : दिलेला नाही

लॉरी बेकर या वास्तुविशारदाचं हे अत्मचरित्र आहे. लॉरी बेकर यांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि अल्पखर्चातली घरं यांच्या प्रचार-प्रसारासाठी आपलं आयुष्य वेचलं. मूळ ब्रिटिश असणारे बेकर तरूण वयात ख्रिश्चन मिशनरींच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भारतात आले.  इथेच रमले. आणि कायमस्वरूपी भारतात राहिले. १९४० च्या दशकात भारतात आलेल्या बेकर यांची गंधिजींशीही भेट झाली. आणि परिचय झाला. घरं ही पंचक्रोशीत उपलब्ध असलेल्या सामानातून बांधली गेली पाहिजेत हा गांधींचा विचार त्यांच्या विचारांशी जुळाणारा होता. भारतात ठिकठिकाणी वास्तव्य करताना गावातले लोक घरं कशी बांधतात, पारंपारिक घरांची रचना आणि त्यात लागणारं सामान काय असतं याचं निरीक्षण आणि अभ्यास बेकर करत रहिले. कुठल्याही क्षेत्रातली पारंपारिक वास्तूकला ही तिथल्या निसर्गाशी जुळवून घेणारी, कमी खर्चातली आणि कमी ऊर्जा(वीज, कोळसा इ.) लागणारी असते हे सुस्पष्ट त्यांना होत गेलं. या पारंपारिक पद्धती टाकून देऊन सिमेंट, कँक्रिट चे ठोकळे आणि काचेच्या पेट्यांसारख्या इमारती बनवणं घातक आहे हा त्यांचा विचार पक्का झाला. त्यातूनच पुढे आयुष्य भर निरनिराळ्या समाजसेवी संस्था, सरकारी इमारती, शाळा, चर्च इ. वास्तू आणि सर्वसामान्यांची घरे यांचे पर्यावरणस्नेही अभिकल्प (डिझाईन) ते करत राहिले.



लॉरी बेकर यांचा हा प्रवास लेखकाने पुस्तकातून मांडला आहे. त्यांना वेगवेगळी कामे कशी मिळत गेली आणि त्या त्या ठिकाणच्या जमिनीच्या रचनेला अनुकूल अभिकल्प त्यांनी कसे दिले हे ओघात समजावून सांगितलं आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर मदतीसाठी त्यांना एका स्वयंसेवी संस्थेने पाचारण केलं होतं. तिथे दगडी घरं पडल्यामुळे लोकांनी बांधकामात दगड वापरण्याचा धसका घेतला होता. पण बेकर यांनी "दगड" ही समस्या नसून त्याची चुकीची रचना ही समस्या आहे हे स्थानिकांना पटवून दिलं. लोकांच्या गरजा जाणून घेऊन पूर्ण गाव कसं वसवावं याचा आराखडा काढून दिला. पण शेवटी त्या संस्थेचा स्वार्थ आणि राजकारण आडवं आलं आणि त्यांना काम पूर्ण करता आलं नाही. हा अनुभवही पुस्तकात आहे.

बेकर यांना केरळ सरकारने काही सरकारी बांधकामांचीही कामं दिली होती. काम गुणवत्तापूर्ण पण किमान खर्चात ते करू लागल्यावर नोकरशाही अस्वस्थ झाली. कामाचा खर्च कमी झाला की मधली दलाली, मलई पण कमी. यामुळे नियमांच्या फराट्याने त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुखयमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली म्हणून ते काम पुढे रेटू शकले. भारतीय नोकरशाहीची ही सर्वज्ञात मानसिकता मोठ्या, निस्वार्थ माणासालाही त्रासदायक ठरते !

बेकर यांनी सांगितलेले काही नियम आणि काही टिप्स पण या पुस्तकात दिल्या आहेत. सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे मझ्यासारख्या वास्तुविशारद कलेशी निगडित नसणाऱ्यालाही त्यांच्या विचाराची कल्पना येते. जे या क्षेत्रात काम करतात त्यांना नक्कीच अधिक खोलात जाऊन याचा अभ्यास करावासा वाटेल.
घर बांधतानच आवश्यक ते फर्निचर - बेड, सोफा - दगडविटांतच बांधून घ्या  इ. हे खरंच मला खूप आवडलं



पुस्तकात त्यांनी बांधलेल्या बांधकामाचीही चित्रं आहेत. काही रेखाचित्र(स्केचेस आहेत). बेकर यांनी स्वतः काढलेली रेखाचिरे आणि व्यंगचित्रे आहेत. तरीही अजून चित्रे असावीत असं वाटत राहतं. "वास्तून त्यांनी विटांची अशी रचना केली होती की प्रकाश मंदपणे आत झिरपेल" असं वाक्य असेल तर त्या वास्तूची कल्पना करणं आणि प्रत्यक्ष बघणं यात फरक आहेच. त्यामुळे कितीही फोटो दिले तरी ते कमीच वाटले असते. यूट्यूब वर मला काही व्हिडिओ मिळाले. ते बघताना पुस्तकातली वर्णने अजून मनाला भिडली.


लेखकाने बेकर यांच्यामधला कलाकार या छान शब्दांत मांडला आहे.



पुस्तकात उपस्थित केलेला एक प्रश्न मात्र अस्वस्थ करतो की - पर्यावरणस्नेही, अल्पखर्चातली घरं असूनही सर्वसामन्यांचा ओढा त्याकडे नाही. श्रीमंतांना "अल्प"खर्चाचं आकर्षण नाही. म्हणून ते कँक्रिटची, काचंची चमकदार घरं बांधतात. गरीबांना कसंही करून मोठ्यांच्या सारखं दिसायचंय. अल्पखर्चातली घरं तशी दिसत नाहीत म्हणून तेसुद्धा पदरमोड करून महगातली घरं बांधयचा अट्टाहास करतायत. यात पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीचा, पुढच्या पिढ्यांचा कोणीच विचार करत नाही. हे पुस्तक पुणे-मुंबई रेल्वे प्रवासात वाचताना बाहेर नजर गेली की हेच भयाण वास्तव सारखं समोर दिसत होतं. कॉंक्रिटची घरं. काचेच्या मोठ्या खिडक्या. "ब्लॉक" पद्धतीत वायूविजनाला समोरासमोर खिडक्या नाहीत. त्यामुळे दिवसाही दिवे लावा आणि वारा येत नाही म्हणून एसी लावा. आपण प्रगती करतो आहोत का अधोगती !

पुस्तक वाचून बेकरांचं सगळं शास्त्र समजणार नाही कारण हे काही त्या विषयावरचं तांत्रिक पुस्तक नाही. पण वास्तूकडे बघण्याचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन जरी आपल्याला लाभला तरी तरी या पुस्तकाने आपल्याला चांगले प्रगल्भ केले असे म्हणायला हरकत नाही.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------

आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...