हा तेल नावाचा इतिहास आहे!... (ha tel navacha itihas ahe!..)




पुस्तक :- हा तेल नावाचा इतिहास आहे!... (ha tel navacha itihas ahe!..)
लेखक :- गिरीश कुबेर (Girish Kuber)
भाषा :- मराठी (Marathi)
पाने :- २५५


पेट्रोल दोन रुपयांनी वाढणार, डिझेल मध्यरात्रीपासून तीस पैशांनी स्वस्त होणार, विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो आणि भावाच्या चढ-उताराप्रमाणे खुश होतो तर कधी चिडतो. बहुतेक वेळा चिडायचीच पाळी येते आणि आपण सरकारला शिव्या देतो. पण पेट्रोल-डिझेल इत्यादींचा भाव ठरवण्यात सरकारचा वाटा आहेच, पण सरकार व्यतिरिक्त अनेक घटक यासाठी कारणीभूत असतात. हे फार कमी लोकांना माहीत असतं. तेलाचं उत्पादन, तेल कंपन्यांचा नफा, उत्पादक आणि विक्रेते देशांचं राजकारण, चाललेली युद्ध अशी एक ना अनेक कारणं/घटक यात सामील असतात. पण खरंच तेलाला ही वेगळी वागणूक का ? एखाद्या कंपनीनं तेल काढलं, आपला नफा धरून हव्या त्या किंमतीला ग्राहकाला विकलं; इतका साधा सोपा व्यवहार का नाही ? देशांचं राजकारण त्यात मधे कुठे आलं ? तेलाचा आणि युद्धाचा काय संबंध ? ... तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील तर त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही "हा तेल नावाचा इतिहास आहे !.." हे पुस्तक वाचायलाच हवं.

लोकसत्ता या दैनिकाचे विद्यमान संपादक श्री. गिरीश कुबेर यांनी हे पुस्तक सखोल अभ्यास करून लिहिलं आहे.
२७ ऑगस्ट १८५९ या दिवशी अमेरिकेतल्या पेनसिल्वेनियातील टायटसव्हिल इथं कर्नल एडविन ड्रेक याच्या विहिरीला तेल लागलं. जगातली ही पहिली तेलविहीर. इथपासून ते पुस्तक प्रकाशित झालं तो पर्यंतचा- म्हणजे २००६ पर्यंतचा - तेलाचा इतिहास, तेलाने कंपन्यांना, देशांना कसं झुलवलं याचा मोठा कालपट लेखक आपल्यासमोर मांडतो.

यात अनेक रोचक, रंजक प्रसंग येतात. वानगी दखल काही.

तेलाच्या सुरुवातीच्या दिवसात जॉन रोकफेलर यांच्या "स्टॅंडर्ड ऑइल" कंपनीने आपला दबदबा निर्माण केला.  बजारात मक्तेदारी निर्माण करण्यासाठी योग्य-अयोग्य सर्व मार्गांचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केलं. शेवटी या अनैतिक मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिकन सरकारला मक्तेदारी विरुद्ध "अ‍ॅंटीट्रस्ट" कायदा करावा लागला.

रशीयतल्या बाकू प्रदेशात तेल सापडलं. त्या तेलाच्या धंद्यात नोबेल बंधू - ज्यांच्या नावने नोबेल दिलं जातं ते आल्फ्रेड नोबेल यांचे भाऊ - उतरले. आणि रशियातल्या तेल उद्योगाला सुरुवात झाली. महाकाय "स्टॅंडर्ड ऑइल" ला टक्कर देत स्वतःचं अस्तित्व त्यांनी टिकवलं आणि वाढवलं. पुढे या बाकू प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावर तेल विहिरी उद्योग सुरू झाले. तिथल्या कामगार चळवळीतून स्टॅलिनचा उदय झाला.

तेलाने खरा रंग दाखवला तो पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात. तोपर्यंत घरगुती वापर, वाहने, जहाजे आणि इतर उद्योगांसाठी तेलाचा वापर खूप वाढला होता. त्यामुळे देश चालवायचा अर्थव्यवस्था टिकवायची तर तेलाचा पुरवठा सतत होत राहिला पाहिजे. त्यामुळे शत्रूराष्ट्राचं तेल रोखणं, दुसऱ्यांच्या कंपन्यांना नामोहरम करणं, तेलवाहू जहाजं फोडणं प्रसंगी तेलविहिरी नष्ट करणं ही सर्व पावलं सामरिक योजनेचा भाग होती. हिटलर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा विस्तारवाद आणि मित्रराष्ट्रांचं प्रत्युत्तर हा इतिहास अनेक वेळा आपण वाचतो पण त्याची ही "तेलकट" बाजू फार पुढे येत नाही. म्हणून ही सर्व प्रकरणे माहितीत मोलाची भर घालतात.

अपण ज्यांना मित्र राष्ट्रे म्हणतो ती देखील स्वार्थासाठीच एकत्र आलेली; स्वतःचं तेल शाबूत ठेवण्यासाठीच "मित्र" बनलेली होती. कारण युद्ध संपताच सुरू झाली ती त्यांच्यतलीच सुंदोपसुंदी. पश्चिम अशिया, पर्शिया इथल्या तेल साठ्यांवर नियंत्रण सर्वांनाच हवं होतं. एकमेकांचे पाय ओढत स्वतःचा स्वार्थ बघत या पाश्चिमात्य देशांनी या भूभागाच्या हव्या तशा फाळण्या केल्या आणि संघर्शाची बीजं रोवली. पाण्यासारखा पैसा ओतून अरबस्तानातल्या शेखांना, राज्यकर्त्यांना आपल्या कह्यात आणलं. तिथल्या स्थानिकांच्या आशाआकांक्षा, त्यांचं कल्याण या पेक्षा सर्वांना महत्वाचा होता तो तेलकंपन्यांचा स्वार्थ, त्यांचा अबाधित तेलपुरवठा आणि त्यांचा नफा. त्यासाठी वेळोवेळी युद्ध खेळली गेली. इस्राएल-इजिप्त आणि शेजारी राष्ट्र यांची युद्धं झाली. एकाच्या बाजूने रशिया तर दुसऱ्याच्य बाजूने अमेरिका असे उभे राहिले; दुसऱ्याचं पारडं जड होऊ नये म्हणून. इराणच्या खोमेनी ला शह देण्यासाठी अमेरिकेने पैसा, शस्त्र देवून उभं केलं सद्दामला आणि झालं इराक-इराण युद्ध. पण पुढे सद्दाम दोईजड होतोय म्हटल्यावर त्याच्या विरोधात अमेरिकेनेच युद्ध सुरू केलं. राशिया अफगाणिस्तानात घुसल्यावर अमेरिकेने त्याच्या विरुद्ध अफगाणी अतिरेक्यांना पाठबळ दिलं आणि आता त्याच अतिरेक्यांविरुद्ध लढायला लागतंय अमेरिकेला. थोडक्यात काय सद्दाम सारख्याची सत्ताकांक्षा असो, काही देशांतला लोकप्रक्षोभ असो की धार्मिक तेढ प्रत्येक बाबीचा वापर इथे केला गेला तेलाकंपन्यांच्या राजकारणासाठी.

तेलावरच पुस्तक असल्यामुळे स्टॅंडर्ड ऑइल,शेल, कोनोको फिलिप्स, अ‍ॅंग्लो अमेरिकन, बर्मा-शेल, ब्रिटिश पेट्रोलियम(BP), एक्सॉन, गल्फ अशा नावाजलेल्या तेलकंपन्यांच्या जन्मकथा त्यांच्या नावामागच्या गोष्टी आपल्याला वाचयला मिळतात. "ओपेक" या तेल उत्पादक देशांच्या संघटनेचा इतिहास आणि युद्ध घडवून आणण्यातलं योगदान हे ही पुस्तकात आहे.

शेवटची काही प्रकरणं या सर्व काळात भारतात काय घडत होतं या बद्दल आहे. पं. नेहरूंच्या मंत्रीमंडळातले केशव देव मालवीय यांच्या नेत्तृत्वामुळे भारतात तेल उद्योग कसा सुरू झाला, तेव्हा आलेल्या अडचणी, अमेरिकेला शह देण्यासाठी रशियाने आपल्याला केलेली मदत, अंकलेश्वर रिफायनरी व बॉम्बे हाय यांच्या जन्मकथा हे सगळं वाचयला मिळेल. भारतातले तेल उत्पादन, वापर, त्याच्यावरची करप्रणाली इ. तांत्रिक भगही लेखकाने समजवून सांगितला आहे.

पुस्तकात काय आहे हे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी इतकं लिहावं लागलं. हे बघूनच हे पुस्तक किती महितीपूर्ण अहे याची कल्पना आली असेलच. इतकी माहिती असूनही हे पुस्तक म्हणजे सनावळ्या, आकडेवारी यांची जंत्री नाही. तर कुबेरांनी ओघवत्या, कथाकथन शैलीत सगळं सांगितलं आहे. आपल्या समोर बसून गप्पांच्या ओघात, गप्पांच्या थाटात ते सांगतायत असंच वाटत राहतं. त्यामुळे वाचताना कंटाळा आला असं होत नाही. पुस्तकात काही जुने फोटो आणि नकाशे देखील आहेत.

तेलाचं राजकारण, राजकारणामागचं कंपन्यांचं अर्थकारण, अर्थकारणामागचा स्वार्थ, स्वार्था मागची सत्ताकांक्षे मागचं तेल; हे सगळं त्रांगडं समजून घ्यायचं आणि या जगाबद्दलचं आपलं आकलन अधिक परिपक्व करायचं तर हे पुस्तक वाचयलाच हवं.



------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------









2 comments:

  1. Mast kaushik... Chaan lihilay
    Aawa ;)
    Short form mast ahe

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ..आपलं नाव कळू शकेल का ?
      जमल्यास ब्लॉगची लिंक शेअर करून इतरांना वाचायला सांगा.
      -कौशिक

      Delete

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...