मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas)




पुस्तक :- मन में है विश्वास (Man Main Hai Vishvas) 
लेखक :- विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre Patil )
भाषा :- मराठी

विश्वास नांगरे-पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या धैर्यशाली नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलीस कारवाईतील सहभागासाठी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आहे. समाजाला बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्त्वाने ते तरूणांचा आदर्श बनले नसते तरच नवल. आणि म्हणूनच विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरूणांशी संवाद साधतायत. तरूणांना -विशेषतः यूपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरूणांना - स्वानुभवातून मार्गदर्शन करायच्या तळमळीपोटी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

२०० पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांत त्यांनी आपलं बालपण, शाळा, कॉलेजच्या वयातल्या आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर, मस्ती करणार, चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात. तरूणपणातला टर्रेबाज, टुकाऱ्या करत फिरणारा, काही वेळा चुकीच्या मार्गाने जाऊ लागलेला तरूणही आपल्या दिसतो. आणि हीच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा ९०% मुलं अशीच असतात पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात. ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणारं, रागावणारं, ओरडणारं कुणीतरी  - घरचे असतील, शिक्षक असतील किंवा कधी मित्र - भेटत गेलं तसं जर त्यांनाही भेटलं तर तेही सावरू शकतील. आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतील हा विचार आपल्या मनात रुजतो.

पुढची जवळपास दीडशे पानं त्यांच्या स्पर्धापरीक्षेच्या अनुभवाबद्दल आहेत. आत्ताचे यशस्वी पोलीस अधिकारी आहेत म्हणजे त्यांनी परीक्षा अगदी सहज-डाव्या हातचा मळ असल्यासारखी पास केली असेल असा आपला ग्रह होऊ शकतो. पण त्यांनाही यश-अपयश बघावं लागलं, आशा-निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या. पुन्हा-पुन्हा स्वतःला प्रोत्साहित करावं लागलं. वाईट सवयींपासून, संगती पासून, प्रलोभनांपासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढावं लागलं. गावाकडनं आलेला मुलगा, इंग्रजी कच्चं असणारा, इंग्रजी संभाषण सफाईदारपणे न जमणारा मुलगा हा न्यूनगंड त्यांनाही वाटला. पण न्यूनगंडामुळे ते थांबले नाहीत तर त्यावर मात करायचे उपाय शोधले आणि प्रगती करत राहिले. हे सगळं तरूणांना कळावं हाच तर त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे.

बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनाही तयारीसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे अशी भ्रमंती करावी लागली. गैरसोयीच्या अवस्थेत राहणं, खाण्यापिण्याची आबाळ सोसावी लागली. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासाचा अवाका मोठा त्यामुळे तयारी करता करता कंटाळा यायचा तर कधी अपयशाच्या विचारांनी आत्मविश्वास जायचा. विश्वासरावांनी स्वतःला कसं अभ्यासाला लावलं हे खरंच प्रेरणादायी आहे. फक्त स्पर्धापरीक्षा देणऱ्यांसाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या, कष्ट करायला तयार असणऱ्या प्रत्येकासाठी आहे.

पुस्तकात शेवटची काही पाने २६/११ च्या हल्ल्याच्या वेळाच्या कारवाई बद्दल आणि राष्ट्रपती पारितोषिकाबद्दल आहे. या प्रसंगाविषयी अजून खुलासेवार लिहिता आलं असतं. पण हा प्रसंग एका स्वतंत्र पुस्तक लिहिण्यासारखा आहे; तसंच प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश वेगळा असल्यामुळे त्यांनी फार लिहिणं टाळलं असेल. पुस्तकात त्यांच्या रेव्ह पार्टीवरची कारवाई,दरोड्यातल्या गुन्हेगारांचा पाठलाग, सामजिक सलोखा निर्माण करून गुन्हेगारी रोखण्याचे उपक्रम इ.ची ओळख प्रसंगोपात होते. 

विश्वासरावांचं काम आणि त्यांची मेहनत हे वाचनीय आहेच पण त्यांची लेखनशैलीही तितचीच प्रवाही आणि प्रभावी आहे. प्रसंगाला अनुसरून त्यांनी बोधकथा, मान्यवरांचे उद्गारही दिले आहेत. तरूणपणातल्या खोड्यांचे प्रसंग आणि त्यांच्या मित्रांचे, गावाकडच्या व्यक्तींचं वर्णन पण मजेशीर आहे. विश्वासरावांनी मराठी साहित्य, इतिहास हे विषय घेऊन उच्च शिक्षण घेतल्यामुळे हे पुस्तक वाचताना आपण एका पोलिसाने लिहिलेलं पुस्तक वाचतोय असं न वाटता एखाद्या सराईत लेखकाने लिहिलेलं आहे असंच वाटत राहतं. 

त्यांनी अजून लिहावं - त्यांच्या पोलीस सेवेच्या अनुभवाबद्दल, उपक्रमांबद्दल, सामाजिक मुक्त चिंतनाबद्दल. वाचकांच्या उड्या पडल्याशिवाय राहणार नाही.




------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade)

पुस्तक - अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका - लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा - मराठी पाने - २३९ प्रकाशन - मेहता पब...